‘वर्षा’ बंगल्यावर 21 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्याचा ठराव करण्यात करण्यात आला. या प्रस्तावावर शिंदे गटाच्या 23 आमदारांनीच सह्या केल्याची बाब देवदत्त कामत यांनी आज सुनावणीत समोर आणली. यामुळे उलट तपासणीला सामोरे जाणारे दिलीप लांडे व योगेश कदम यांची तारांबळ उडाली. बैठकीआधीच सह्या घेतल्याचे सांगत लांडे यांनी वेळ मारून नेली. तर कदमांनी सही आपल्यासारखी दिसते, पण अशा कागदावर सह्या केल्याचे आठवत नसल्याचे सांगितले.
आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीत आज शिंदे गटाचे दिलीप लांडे व योगेश कदम यांची शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वकील अॅड. देवदत्त कामत यांनी सुमारे साडे सहा तास उलट तपासणी केली. त्यातून ‘वर्षा’वरील बैठकीच्या हजेरीपटाच्या संदर्भातील तपशील पुढे आला.
लांडेंकडून टोलवाटोलवीची उत्तरे
22 ते 30 जून 2022 या काळात मुंबईबाहेर प्रवास केला होता का ? त्यावर हो, असे उत्तर दिले. या काळात तुम्ही महाराष्ट्राबाहेर कुठे गेला होतात? ही माझी खासगी माहिती आहे. ती मी सांगू शकत नाही. मी कुठेही फिरू शकत नाही. ही माझी खासगी माहिती आहे ती सांगू शकत नाही. मी कुठेही फिरू शकतो, असे उत्तर आले. तेव्हा तुम्ही सुरत-गुवाहाटीमध्ये राहिलात त्याचे भाडे भाजपने दिले का? मी स्वतः गेलो होतो, पण कुठे गेलो होतो याची माहिती मी कोणाला देऊ शकत नाही. या काळात तुम्ही महाराष्ट्राबाहेर खासगी चार्टर्ड विमानाने गेला होता का? त्यावर ही मी खासगी जीवनाची बाब आहे. मी रिक्षा चालवत गेलो किंवा मी बैलगाडीने गेलो हे सांगू शकत नाही, असे टोलवाटोलवीचे उत्तर दिलीप लांडे यांनी दिले.
सह्यांवरून घूमजाव
21 जून 2022 रोजी ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होता का? असा प्रश्न देवदत्त कामत यांनी केला. त्यावर दिलीप लांडे यांनी हो सांगितले. त्यावर या बैठकीचे अध्यक्ष अजय चौधरी होते का? असे विचारले असता लांडे म्हणाले ते अध्यक्ष नव्हते, ती बैठक पक्षाच्या नेते मंडळींची होती.
‘वर्षा’वर झालेल्या बैठकीतील हजेरीपट दाखवला जात आहे त्यावर आपण सही केली का? त्यावर लांडे यांनी हो, पण विधिमंडळ सदस्यांच्या यादीवर सह्या घेतलेल्या असतात. आमची यादी तयार केली आणि सह्या घेतल्या. उदय सामंत आणि वैभव नाईक यांनी नंतर येऊन बैठक उपस्थिती पत्रावर 22 जून 2022 रोजी सही केली की नाही याबाबत मला माहित नाही, असे उत्तर दिलीप लांडे यांनी दिले.
त्यानंतर हजेरीपटावर दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम उदय सामंत यांच्यासह इतर आमदारांच्या सह्या असलेला हजेरीपट देवदत्त कामत यांनी समोर आणला.
सुरत-गुवाहाटीवर लांडे-कदमांचे मौन
सुरत-गुवाहाटी प्रवासाच्या संदर्भात देवदत्त कामत यांनी दिलीप लांडे व योगेश कदम या दोघांचीही स्वतंत्र उलट तपासणी केली. त्यावर दोघांनी सोयिस्कररीत्या मौन बाळगले. 22 जून 2022 रोजी तुम्ही कुठे होतात? या प्रश्नावर मी मुंबईबाहेर होतो, असे उत्तर योगेश कदम यांनी दिले. त्यावर मुंबईबाहेर कुठे होतात? असे विचारले असता मी सकाळी सुरत व त्याच रात्री मी गुवाहाटीत होतो, असे उत्तर त्याने दिले. सुरत व गुवाहाटीला एकनाथ शिंदेसोबत गेला होता का? यावर त्यांनी होय, असे उत्तर दिले. किती दिवस गुवाहाटीला होतात? मुंबईला कधी परत आलात? अशी विचारणा कामत यांनी केली असता त्याची तारीख मला आठवत नाही, असे उत्तर दिले.
गुवाहाटीला तुम्ही असताना किती आमदार होते? माझ्यासह 39 आमदार होते. तुम्ही गुवाहाटीला जाण्यासाठी विमानाची तिकिटे स्वतः काढली का? त्याचे पैसे तुम्ही दिले का? गुवाहाटीच्या हॉटेलचे नाव काय? हॉटेल बुपिंग एकनाथ शिंदे यांनी केले का भाजपने केल? त्यावर ही माझी वैयक्तिक माहिती आहे. यावर मला अधिक बोलायचे नाही, असे उत्तर त्याने दिले. त्यावर कामत यांनी गुवाहाटीमधील भाजपच्या सरकारने एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतच्या आमदारांना संरक्षण दिले होतो का? असा प्रश्न केला असता त्यावर असे मला वाटत नाही, असे उत्तर योगेश कदम यांनी दिले.