आमदार निधी घ्या;रेमडेसिवीर द्या! सात आमदारांनी दिला निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सर्व आमदारांना मिळणाऱ्या स्थानिक विकास निधी म्हणजेच आमदार निधीतून एक कोटी रूपये कोरोना नियंत्रण आणि उपाययोजनांवरील कामांसाठी खर्च करण्यास परवानगी दिली.पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी 15 ते 30 लाख रूपयांपर्यंतची रक्कम ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन्स खेरेदीसाठी देण्याची शिफारस जिल्हा नियोजन विभागाला केली आहे.पिंपरी-चिंचवडमधील आमदारांनी ऑक्सीजन प्लाण्टसाठी हा निधी खर्च करावा,यासाठी पत्र दिले असून,काही आमदारांनी वैद्यकीय उपकरणांना पसंती दिली आहे.

तातडीची गरज म्हणून सध्या तुटवडा असलेल्या कोरोनावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीसाठी सर्वाधिक आमदारांची पसंती आहे.जिल्हा नियोजन विभागाने खरेदीचे आदेश तयार केले असले,तरी प्रत्यक्षात रेमडेसिविर इंजेक्शन बाजारातच उपलब्ध नसल्याने इंजेक्शन खरेदी कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत.

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी रेमडेसिविरसाठी 30 लाख रूपये प्रस्तावित केले आहेत.याशिवाय आमदार सुनिल कांबळे ,भीमराव तापकीर ,अशोक पवार,अतुल बेनके,मुक्ता टिळक यांच्यासह अन्य काही आमदारांनीदेखील रेमडेसिविरसाठी निधी देण्याची शिफारस केली आहे.इतर आमदारांचे प्रस्ताव येत आहेत.

आमदार निधीमधून खरेदी केलेली रेमडेसिविर इंजेक्शन फक्त त्यांच्या मतदरासंघातील सरकारी आणि जिल्हा रूग्णालयांनाच दिली जाणार आहेत.काही आमदारांच्या शिफारशीवरून खरेदीचे आदेशदेखील दिले आहेत.परंतु रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांकडून साठा नसल्याने पुरवठा होत नाही.इंजेक्शनचा पुरवठा कधी केला जाईल,याबद्दल शाश्वती उत्पादक कंपन्यांकडून दिली जात नसल्याने सध्यातरी अडचणीची स्थिती आहे.

पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील आमदारांनी ऑक्सीजन प्लाण्टसाठी आमदार निधी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.ऑक्सीजन प्लाण्ट उभा करण्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडे परवानगी मागण्यात आली असून,ती तात्काळ मिळेल.त्यानंतर प्रस्ताव आणि निविदा जाहीर केली जाणार आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून 200 कोटी

जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण निधीपैकी 30 टक्के निधी हा कोरोना आणि आरोग्यविषयक उपाययोजनांवर खर्च करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी सुमारे 200 कोटी रूपये निधी उपलब्ध झाला आहे.त्यातील 14 कोटी रूपयांची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत.