दुष्काळी चर्चेत शिवसेना आमदार हेमंत पाटील आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

विष्णूपुरी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांसाठी सोडले, मात्र याचवेळी जिल्हा प्रशासनाने खासदार अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरुन शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्याने कॅनालमध्ये आलेले पाणी शेतकऱ्यांनी ओंजळीने आपल्या शेतापर्यंत न्यायचे काय, असा सवाल आमदार हेमंत पाटील यांनी विधानसभेत दुष्काळावरील चर्चेत करुन आमच्या परिसरातील दुष्काळ हा मानवनिर्मित दुष्काळ असून, त्याला संपूर्णपणे खासदार अशोक चव्हाण हे कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काल विधानसभेत दुष्काळावर झालेल्या चर्चेत शिवसेना आमदार हेमंत पाटील चांगलेच आक्रमक झाले. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे. पाणी वाटप समितीने विष्णूपुरी प्रकल्पाचे एक आवर्तन या महिन्यात सोडले. मात्र हे पाणी सोडण्यास अनेकांचा विरोध होता. त्यात खा.अशोक चव्हाण पण होते. शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी विष्णूपुरी प्रकल्पाचे वीजबील माफ करण्यासंदर्भात आपण पाठपुरावा केला, पाणी लिफ्ट करण्यासाठी चार वेगवेगळे ट्रान्सफार्मर बसविले. पाणी वाटप समितीच्या बैठकीत विष्णूपुरी प्रकल्पाच्या दोन आवर्तनांना आपण पाठपुरावा करुन मंजुरीही मिळवली, अशीही माहिती नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी यावेळी दिली. मात्र या महिन्यात विष्णूपुरी प्रकल्पाचे पाणी कॅनॉलव्दारे सोडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या परिसरातील वेगवेगळ्या डिपीवरील वीज कनेक्शन तसेच शेतकऱ्यांच्या मोटारींचे वीज कनेक्शन तोडले. खासदार अशोक चव्हाण यांचा हे पाणी सोडण्यास विरोध होता, त्यांनी दबावतंत्र वापरुन हे वीज कनेक्शन बंद करायला लावले. आता कॅनॉलमध्ये आलेले पाणी शेतकऱ्यांनी ओंजळीने आपल्या शेतात न्यायचे काय, हा कुठला न्याय, याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी आमदार हेमंत पाटील यांनी केली.

मलाही नांदेडची काळजी आहे, माझ्या मतदारसंघात दोन लाख मतदार शहरी असले तरी विष्णूपुरी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांनाही मिळाले पाहिजे, हा माझा नेहमीच आग्रह राहिला आहे. त्यातून यावर्षी पाणी सोडल्यानंतर प्रशासनाने त्यांचे हाल केले, याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. पीकविम्याच्या संदर्भात काही खाजगी कंपनीना हे काम देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना हा पीकविमा कसा मिळणार नाही, याचीच काळजी हे खाजगी कंपनीवाले घेत असून यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सरकारी कंपन्यांना पीकविमा योजनेचे काम देण्यात यावे, अशी आग्रहाची मागणी त्यांनी केली. आमच्या भागात सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे मात्र याचे पंचनामे करताना खाजगी कंपन्याकडून पक्षपात केला जात असल्याचा आरोप त्यांनी केली. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पैनगंगा नदीत इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात यावे यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून काही शेतकरी पैनगंगेच्या कोरड्या पात्रात आंदोलन करत आहेत. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर या मागणीकडे देखील शासनाने तातडीने लक्ष देवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही आमदार हेमंत पाटील यांनी केली.