
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
सुमारे तीन तास रस्ता रोखून धरणाऱ्या आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. कन्नडचे आमदार जाधव यांनी हतनूर येथे तीन तास रस्ता अडवला होता. पीक विमा कर्जासंदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि हातनूर रस्त्याच्या कामांबाबत जाधव यांनी आंदोलन केले होते.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळावा तसेच हतनूर रस्त्याचे काम चांगले व्हावे यासाठी जाधव यांनी मंगळवार सकाळपासून रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते. जाधव यांनी सकाळी 10 वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी अनेकदा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधव यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अखेर तीन तासानंतर कन्नड ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली. जाधव यांच्या आंदोलनामुळे हतनूर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून रस्ता वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.


























































