सरनाईकांना गुंतवण्यासाठीच ईडीला माझा ताबा हवाय! अमित चांदोले यांचा हायकोर्टात युक्तिवाद

mumbai-highcourt

टॉप्स ग्रुपने एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमित चांदोले यांची कस्टडी मागण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हायकोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेला चांदोले यांनी आज जोरदार विरोध केला. आमदार प्रताप सरनाईक माझे निकटवर्तीय आहेत. त्यांना गुंतवण्यासाठीच ईडीला माझा ताबा हवा आहे, असा जोरदार युक्तिवाद अमित चांदोले यांनी आज हायकोर्टात केला.

कोठडीची मुदत संपल्याने अमित चांदोले यांना रविवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची रवानगी ईडी कोठडीत करण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. मात्र त्याबाबतचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात ईडीला अपयश आल्याने चांदोले यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

याविरोधात ईडीने हायकोर्टात अपील केले असून न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर आज सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे व व्यवहाराबाबत चौकशी करायची आहे म्हणूनच चांदोले यांचा रिमांड हवा आहे, असा युक्तिवाद ईडीची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला.

मात्र चांदोले यांची बाजू मांडणारे वकील रिझवान मर्चंट यांनी ईडीच्या या दाव्याचे खंडन केले. विशेष न्यायालयात कागदपत्रे दाखल न केल्यामुळे ईडीची मागणी फेटाळण्यात आली. केवळ सरनाईक यांना अडकविण्यासाठीच आपल्या अशिलाचा रिमांड मागितला जात असल्याचे अॅड. मर्चंट यांनी सांगितले. त्याचबरोबर सरनाईक यांचे आर्थिक व्यवहार आपल्याला माहीत नाहीत, मी त्यांचा सीए नाही, असे चांदोलेच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आले.

रिमांडशिवाय तपास शक्य नाही का?

चांदोले यांच्या कोठडीशिवाय ईडी तपास करू शकणार नाही का, असा सवाल हायकोर्टाने सॉलिसिटर जनरल यांना सुनावणीवेळी विचारला. तसेच योग्य कारण असल्याशिवाय व्यक्तीचे स्वातंत्र्य बाधित होऊ शकत नाही, असे मत व्यक्त करत हायकोर्टाने याबाबतचा निकाल राखून ठेवला.

आपली प्रतिक्रिया द्या