
स्थानिक जनतेच्या मागणीनुसार आरेतील अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास आजपासून सुरुवात झाली. आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते आरेतील एकूण 4 अंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ पार पडला. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल 1 कोटी 97 लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच मुंबई महानगरपालिकेकडून रुपये 47 कोटी खर्चून आरेतील सुमारे 7 किलोमीटरच्या मुख्य रस्त्याच्या कामाचेही भूमिपूजन पर्यावरण, पर्यटन व उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहितीही वायकर यांनी यावेळी दिली.
आरेतील 45 किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेत वाढ होत असल्याने हे रस्ते मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावे अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करून येथील जनतेला दिलासा देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत आमदार रवींद्र वायकर यांनी बैठका व पत्रव्यवहारही केला होता. त्यानुसार सरकारने पहिल्या टप्प्यात 3 कोटी 25 लाख रुपये मंजूर करून हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता. त्यानुसार आरेतील कार्यकारी अभियंता रामटेक यांनी आरेतील अंतर्गत 10 रस्ते प्रस्तावित केले होते. रस्त्यांच्या कामांच्या शुभारंभावेळी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, नगरसेविका रेखा रामवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कदम, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख बाळा तावडे, संदीप गाढवे, अर्पणा परळकर, हर्षदा गावडे, मयूरी रेवाळे, सुरेखा गुटे, पूजा शिंदे उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात 4 रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात युनिट क्र. 5 (मार्केट) मयूर नगर बस स्टॉपपर्यंतचा रस्ता (1500 मीटर), युनिट क्र. 6 आरे हॉस्पिटलपर्यंत रस्ता (600 मीटर), पिकनिक पॉइंट ते युनिट क्र. 25 पर्यंतचा रस्ता (250 मीटर) व पोलीस ठाणे ते छोटा कश्मीर (250 मीटर) या रस्ते दुरुस्तीच्या पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.



























































