
बीडमध्ये रविवार मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले असणार. त्याची पाहणी करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर हे भल्या पहाटे पासून मतदारसंघामध्ये फिरत होते. हा दौरा सुरू असताना शिरापूरमध्ये पाण्याने वेढा दिला आहे आणि पुराच्या पाण्यात आठ महिन्याच्या बाळासह बाळाची आई अडकल्याची माहिती मिळताच संदीप क्षीरसागर यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहाय्याने त्यांनी स्वत: घटनास्थळी जात त्या बाळाला आणि आईला सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.
संदीप क्षीरसागर चार दिवसांपासून बीड मतदारसंघाच्या गावागावात खेड्याखेड्यात जात आहेत. आज ते पूर पाहणी करण्यासाठी बीड तालुक्यातील शिरापूर येथे पोहचले असता पुराच्या पाण्यामध्ये चिमुकल्या बाळासह त्याची आई अडकल्याची माहिती त्यांना मिळाली. संदीप क्षीरसागर यांनी तातडीने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन अवघ्या काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने संदीप क्षीरसागरांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या त्या बाळासह आईला सुखरूप बाहेर काढले.