आमदार संग्राम जगताप यांच्या कारला अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारला मंगळवारी पहाटे मुंबईजवळ भीषण अपघात झाला. या अपघातातून आमदार जगताप थोडक्यात बचावले आहेत.

मुंबईतील कामासाठी आमदार जगताप कार्यकर्त्यांसह रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. गाडीत ते, चालक व दोन कार्यकर्ते होते. मुंबईच्या जवळ गेल्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी लेन खोदून रस्ता वळवला होता. जगताप यांच्या कारच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती तिसऱया लेनमधून जात होती. मात्र, पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. त्यावेळी त्या लेनमधून जगताप यांची कार भरधाव वेगाने जात होती. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांच्या कारचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कार बसवर मागील बाजूने धडकली. या अपघातात जगताप यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. मात्र, सीटबेल्ट लावलेला असल्याने आणि अत्याधुनिक सुरक्षा असलेले वाहन असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले.