राष्ट्रवादी हा कानफुक्यांचा पक्ष, सुरेश धस यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

राष्ट्रवादीमध्ये कान फुंकणाऱ्याचे ऐकले जाते. तो कानफुक्यांचा पक्ष झाला आहे. राष्ट्रवादीमध्ये म्हणजे घरफोडी सहकारी संस्था झाली आहे, असा जबरदस्त हल्लाबोल आमदार सुरेश धस यांनी केला. बीड येथे विकासकामांच्या शुभारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात सुरेश धस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते.

धस म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्हाला विकासासाठी कोट्यावधी रूपये मिळत आहेत. पंकजा मुंडे तर 50 कोटीच्या आत एकही विकास कामाचा शुभारंभ करत नाहीत. एवढा मोठा विकास निधी जिल्ह्याच्या वाट्याला येत आहे. नाही तर आम्हाला आमचा आधीचा पक्ष तुम्हाला दोन कोटी रूपये दिलेत ना असे म्हणून खूष करत होता. आमच्या जिल्ह्यात काही नेते खूप मोठे झाले आहेत. ते थेट पंतप्रधान मोदींवर टीका करतात. आम्ही कधीच पवारांबाबत बोलत नाहीत. आमची बोलण्याची ती लायकीही नाही. ज्यांची कारकीर्द स्व. मुंडेंपासून सुरू झाली ते गल्लीत गोंधळ घालतात आणि दिल्लीत मुजरा करतात. बीड जिल्ह्यात रेल्वेचे काम झपाट्याने होत आहे. खऱ्या अर्थाने स्व.गोपीनाथराव मुंडे आणि स्व. केशरकाकू क्षीरसागर यांचे स्वप्न पूर्ण होत आहे असेही सुरेश धस म्हणाले.