
सन 2026 पर्यंत मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो रेल्वेचे 337 किलोमीटरचे जाळे पसरवण्याची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) योजना आहे. मुंबईत सध्या विविध मेट्रो मार्गांसह उड्डाणपुले उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत त्यातील अनेक प्रकल्प पूर्ण होतील, पण त्याबरोबरच यंदाच्या वर्षी 87.6 किलोमीटरच्या चार नव्या मेट्रो मार्गांचेही काम सुरू केले जाणार आहे.
वाहतुकीची कोंडी आणि लोकलमधील गर्दी यावर पर्याय म्हणून मेट्रो रेल्वे ही मुंबईची नवी जीवनवाहिनी बनवण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यासाठी भुयारी मेट्रोसह विविध मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. वर्सोवा-घाटकोपर मेट्रो रेल्वेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद लाभत असून चालू वर्षात आणखी दोन मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-2 ए आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो-7 या वर्षीच्या अखेरपर्यंत सुरू केले जाणार आहेत.
कलानगर उड्डाणपूल मार्चमध्ये खुला होणार
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी उभारला जाणारा कलानगर उड्डाणपूल येत्या मार्चमध्ये वाहतुकीसाठी खुला होईल. त्याबरोबरच सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड आणि बीकेसी-वाकोला जंक्शनचेही काम या वर्षी पूर्ण होईल असा विश्वास एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी व्यक्त केला आहे. कासारवडवली ते गायमुख मेट्रो-4 ए, ठाणे ते भिवंडी-कल्याण मेट्रो-5, दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो-7 ए आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो-9 या प्रकल्पांचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे.
असे आहेत नवे मेट्रो मार्ग
मेट्रो-10 – गायमुख ते शिवाजी नगर – 9.2 किलोमीटर
मेट्रो-11 – वडाळा ते जीपीओ – 12.7 किलोमीटर
मेट्रो-12 – कल्याण ते तळोजा – 20.7 किलोमीटर
मेट्रो-14 – कांजुरमार्ग ते बदलापूर – 45 किलोमीटर
डी. एन. नगर-दहिसर मेट्रोला गोराईशी जोडण्यासाठी खाडीवरून रोप-वे
डी. एन. नगर ते दहिसर मेट्रो रेल्वेने प्रवास करणाऱया प्रवाशांना थेट गोराईलाही जाता येणार आहे. या मेट्रो-2 ए मार्गावरील महावीर नगर स्थानक येथून गोराईला जाण्यासाठी खाडीवरून रोप-वे टाकण्याची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) योजना आहे.
एमएमआरडीएने यापूर्वी चारकोप ते मार्वे गाव असा 3.6 किलोमीटरचा रोप-वे सुरू करण्याची योजना बनवली होती, परंतु काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने शिवडी ते एलिफंटा असा रोप-वे टाकला जाणार आहे. त्यामुळे महावीर नगर स्थानक ते गोराई हा मुंबईतील दुसरा रोप-वे ठरणार आहे. या रोपवेसाठी 500 कोटी रुपये खर्च येणार आहे. या रोप-वे मार्गावर आठ स्थानके असणार असून स्थानकांची ठिकाणे अद्याप निश्चित करायची आहेत अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. रोप-वे निर्मितीच्या कामासाठी महिनाअखेरीस निविदा काढल्या जाणार आहेत. हा रोप-वे झाल्यास चारकोप कांदिवलीतील नागरिकांनाही सोयीचे ठरणार आहे. लिंक रोडवरील ट्रफिकमध्ये फसण्यापेक्षा या रोप-वेने चारकोपवरून कांदिवलीला किमान वेळात जाता येणार आहे. सध्या गोराई आणि मनोरी गावातील ग्रामस्थ बोरिवलीला जाण्यासाठी फेरीबोटचा वापर करतात. बहुतांश ग्रामस्थ हे गावातून भाजी घेऊन विक्रीसाठी बोरिवलीला जातात. त्यांना फेरीबोट सुलभ ठरते. रोप-वेने त्यांना फक्त स्वतःला प्रवास करता येणार आहे, कोणतेही सामान वाहून नेता येणार नाही.






























































