
मुंबई महानगरपालिकेसाठी उद्या म्हणजेच गुरुवारी 15 जानेवारीला मतदान होणार आहेत. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी रात्र वैऱ्याची… म्हणत मराठी माणसासाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मराठी माणूस चुकला तर मग पुन्हा संधी नाही, असा सावधगिरीचा इशाराही दिला आहे.
बाळा नांदगावकर यांनी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी मतदारांना म्हटले आहे की, रात्र वैऱ्याची आहे, आता तरी जागा हो. उद्या गुरुवारी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान करताना फक्त 2 मिनिटे शांत चित्ताने विचार करा की, ही निवडणूक किती महत्त्वाची आहे. यावेळी मराठी माणूस चुकला तर, मग पुन्हा संधी नाही, असा सावधगिरीचा इशाराही दिला आहे. शिवाय जर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकत्र यायचे असते तर, ते कधीच आले असते. पण ते केवळ आपल्या माय मराठीसाठी, आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी ही लढाई किती महत्त्वाची आहे, हे जाणून ते दोघं नेक इराद्याने एक झाले आहेत, असे बाळा नांदगावकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
समोरील विरोधक बलाढ्य, धनदांडगे, सत्ताधारी असले तरी आपण एकीने, ठाकरेंच्या बरोबरीने लढलो तर आपण त्यांना हरवू शकतो. माझ्या एका मताने काय होईल, असा विचार न करता मी अजून किती जणांना सांगू शकतो ते बघा आणि सर्व ताकद आपल्या माणसांसाठी लावा. ही विनंती केवळ मुंबईतील नागरिकांना नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आहे. रात्र वैऱ्याची आहे. पण या अंधार रात्रीनंतर जी आशेची किरण घेऊन येणारी सकाळ आहे ती सोनेरी आहे. मी महाराष्ट्रासाठी खारीचा वाटा उचलत आहे. तुम्हीही पुढे या, असे आवाहन बाळा नांदगावकर यांनी यावेळी केले आहे.



























































