
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दिल्लीतल्या मोतिया खानमध्ये जमावहत्येची घटना समोर आली आहे. रोहित डेकोरेटोर्स समोर एका तरुणाला जमावाने मारहाण करून त्याचा खून केला. डेकोरेटर्सचा मालक आणि त्याचा नोकराने तरुणाला मारणास सुरूवात केली. सदर तरुण हा चोरी करत होता असा संशय मालकाला आला. त्यानंतर मालकाने मारहाण करण्यास सुरूवात केल्यानंतर लोकांनीही त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली.
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी डेकोरेटर्सचा मालक रोहित कुमार आणि त्याचा नोकर सोनू रायला अटक केली आहे. दोघांवर खुनाचा आरोप दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री ११ वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा तरुण जखमी अवस्थेत होता परंतु त्याला काहीच बोलता येत नव्हते. इस्पितळात दाखल करण्यासाठी नेताना त्याने प्राण सोडले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

























































