’ऍक्वा लाईन’मध्ये अखेर मोबाईलची रिंग वाजणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुयारी मेट्रो मार्गिकेत (ऍक्वा लाईन) अखेर मोबाईल नेटवर्कचा प्रश्न सुटणार आहे. मुंबई मेट्रो रेल प्रशासनाने मेट्रो-3 मार्गिकेवरील मोबाईल नेटवर्क सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांना दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे प्रवाशांना लवकरच भुयारी मेट्रोतून प्रवास करतानाही मोबाईलवरून संपर्क साधता येणार आहे.

आरे जेव्हीएलआर ते कफ परेडदरम्यान धावणाऱ्या भुयारी मेट्रोत मोबाईल नेटवर्कचा मोठा प्रश्न आहे. मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने संपूर्ण प्रवासात मोबाईलवरून संपर्क साधणे अशक्य बनते. परिणामी, आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्याची चिंता सतावत असते. याबाबत प्रवाशांनी आवाज उठवल्यानंतर मुंबई मेट्रो रेल प्रशासनाने मोबाईल नेटवर्क सुविधा सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यानुसार भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्यांना भूमिगत स्थानके व बोगद्यांमध्ये आयबीएस प्रणाली उभारणे, संचालन आणि देखभालीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अखंड व्हॉइस व डेटा कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळणार असून सर्व दूरसंचार सेवा प्रदाते लवकरच स्थानके व बोगद्यांमध्ये सिग्नल सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.