
रिलायन्सच्या जीओने मोबाईल रिंगटोन 25 सेकंद केल्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर दूरसंचार नियामक प्राधिकरण ‘ट्राय’ने आज मोबाईल आणि लँडलाइनच्या रिंगटोनसाठी कालावधी निश्चित केला. ट्रायने मोबाईलसाठी 30 सेकंद तर लँडलाइनसाठी 60 सेकंदांचा कालावधी निश्चित केला आहे.
जगभरात मोबाईल रिंगटोनचा कालावधी 30 सेकंद आहे, मात्र हिंदुस्थानात मोबाईल रिंगटोनसाठी आतापर्यंत निश्चित असा कालावधी नव्हता. हिंदुस्थानातील मोबाईल रिंगटोनचा कालावधी या आधी अंदाजे 30 ते 60 सेकंदाचा होता. त्यात आता बदल झाला आहे.
‘आययूसी’ शुल्कावरही होणार निर्णय
लँडलाइन आणि मोबाईलचा रिंगटोन कालावधी ठरवल्यानंतर आता दुसऱया नेटवर्कचा वापर करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘आययूसी’ शुल्कावरही लवकरच निर्णय केला जाणार आहे. ट्रायने याबाबत निश्चित स्वरूपाचे शुल्क ठरवावे अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून दूरसंचार कंपन्यांकडून केली जात आहे.
























































