मोबाईलचोरीचा आठ तासांत लावला छडा- औंध पोलिसांची कामगिरी; आरोपी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईलचोरीच्या गुह्यातील आरोपीस आठ तासांत शोधून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. संशयित आरोपीला आष्टा (ता. वाळवा) येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथे ऊसतोड कामगार अशोक देविदास चौरे हे मंगळवारी (दि. 7) रात्री आपला मोबाईल चार्ंजगला लावून झोपले होते. सकाळी तो मोबाईल चोरीला गेल्याचे चौरे यांच्या लक्षात आले. चौरे यांनी तातडीने औंध पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, हवालदार आर. एस. सरतापे, के. एल. जाधव, के. एन. हिरवे, एस. आर. पोळ, हवालदार कांबळे, प्रकाश यादव यांच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी अभिषेक फ्रेस्नो पवार (वय 19, रा. आष्टा, ता. वाळवा)  याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मोबाईलसह एक दुचाकी जप्त केली. दुचाकीबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिषेक पवार याच्याकडून आणखी काही गुह्यांची उकल होण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अवघ्या काही तासांत मोबाईलचोरीतील आरोपीला जेरबंद केल्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.