
पुण्यात नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकाविणाऱ्य़ा दोघा सराईतांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 गुन्ह्यांची उकल करीत 1लाख 90 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अजय सावंत आणि राजेश नेटके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजय हा पिंपरीतील बहुचर्चित हितेश मुलचंदाणी खून प्रकरणातील आरोपी आहे. औंध परिसरात मुलीसोबत दुचाकीवर चाललेल्या महिलेच्या हातातील मोबाइल हिसकविणारे खडकी परिसरात फिरत असल्याची माहिती कर्मचारी विशाल शिर्के व राकेश खुनवे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अजय आणि राजेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी शहरात लुटमारीचे 4 आणि वाहन चोरीचे 4 असे एकूण 8 गुन्ह्यांची कबुली दिली. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, सचिन ढवळे, विशाल शिर्के, शंकर पाटील, गणेश साळुंखे, निलेश शिवतारे, दत्ता फुलसुंदर यांच्या पथकाने केली.






























































