घरुन शुटिंगसाठी गेली ती परतलीच नाही, तिसऱ्या दिवशी मॉडेलचा थेट मृतदेह आढळला

घरुन शुटिंगसाठी गेलेल्या मॉडेलचा तिसऱ्या दिवशी थेट मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मॉडेलची हत्या करुन मृतदेह कालव्यात फेकण्यात आला. शितल चौधरी असे हत्या झालेल्या मॉडेलचे नाव आहे. हरियाणातील सोनीपत येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

पानिपत जिल्ह्यातील खलीला मजार गावातील रहिवासी असलेली शितल शनिवारी एका अल्बमच्या शुटिंगसाठी घरुन गेली. मात्र ती घरी परतलीच नाही. तसेच तिचा फोनही लागत नव्हता. यामुळे तिच्या बहिणीने पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलीस तिचा शोध घेत होते.

सोमवारी सोनीपत पोलिसांना कालव्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या महिलेची ओळख पटवण्यासाठी बेपत्ता महिलांची माहिती तपासली असता पानिपत येथील शितल चौधरी ही बेपत्ता असल्याचे कळले. यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.

शितलचा बॉयफ्रेंड तिला मारहाण करत असून तिला बळजबरीने स्वतःसोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा, अशी माहिती तिच्या बहिणीने पोलिसांना दिली. शितलचा गळा कापून तिची हत्या करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी शितलच्या प्रियकराची कार जप्त केली आहे. शितल चौधरी मॉडेलिंह व्यतिरिक्त सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरही होती. तिचे इन्स्टाग्रामवर 1.6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.