फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल, वाहनधारकांना मोदी सरकारचा धक्का; नवा नियम 15 नोव्हेंबरपासून

देशभरातील रस्त्यांची योग्य देखभाल केली जात नसतानाही टोलवसुली सुरूच आहे. याविरोधात वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत असतानाच केंद्रातील मोदी सरकार टोलनाक्यांवर 15 नोव्हेंबरपासून नवा नियम लागू करणार आहे. जर गाडीवर फास्टॅग नसेल तर वाहनधारकांना यूपीआयच्या माध्यमातून सव्वापट टोल भरावा लागणार आहे. तसेच रोख रक्कम दिल्यास दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या या नव्या नियमाने वाहनधारकांना मोठा धक्का दिला आहे.

टोलनाक्यांवर ‘डिजिटल पेमेंट’ला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन नियमावली लागू केली जात असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. याच अनुषंगाने केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 2008 मधील राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमावलीमध्ये सुधारणा केली आहे. नव्या नियमानुसार टोलनाक्यावर प्रवेश करणाऱया गाडीला फास्टॅगद्वारे टोल भरणा करावा लागणार आहे. जर गाडीवर फास्टॅग नसेल आणि तो संबंधित वाहनचालक यूपीआयच्या सहाय्याने टोलची रक्कम भरणार असेल तर त्याला सव्वापट अधिक टोल द्यावा लागेल. तसेच जर वाहनचालक रोख रक्कम देऊन टोल भरणार असेल वाहनधारकांना टोलची दुप्पट रक्कम द्यावी लागेल. ही नवीन नियमावली पुढील महिन्यात 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.