
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात मोठा गाजावाजा करत राबविण्यात आलेल्या उज्ज्वला योजनेवर कॅगने ठपका ठेवला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना एलपीजी गॅस जोडणी देण्याची योजना केंद्र सरकारने आखली खरी पण गरजवंतांऐवजी ज्यांना गरज नाही अशा लोकांना योजनेचा लाभ दिला. तसेच 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना गॅस जोडणी दिल्याची धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालातून पुढे आली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत आठ कोटींहून अधिक जोडण्या देण्यात आल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. एलपीजी गॅसच्या जोडण्या देण्यात आल्या असल्या तरी त्याचा नियमित वापर होताना दिसत नसल्याचे दिसून येत आहे. या योजनेंतर्गत 1.93 कोटी लाभार्थ्यांना जोडणी दिली होती त्यातील एक लाभार्थी वर्षाला 3.66 एलपीजी रिफील करतो तर 31 डिसेंबरपर्यंत 3.18 कोटी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा विचार केला तर वर्षाला फक्त 3.21 एलपीजी रिफील केले जात आहेत. याचा अर्थ सिलिंडर घेतले पण ते रिफील केले जात नसल्याचे कॅगने म्हटले आहे.
पुरुष आणि अल्पवयीनांना लाभ
उज्वला योजनेंतर्गत महिलांना एलपीजी जोडणी दिली जाते, मात्र या योजनेअंतर्गत तब्बल 1.88 लाख पुरुषांना जोडण्या दिल्या गेल्या आहेत. तसे सॉफ्टवेअरमधील घोळामुळे18 पेक्षा कमी वयाच्या लोकांना 80 हजार जोडण्या देण्याची परवानगी दिली गेल्याची धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालातून पुढे आली आहे.
घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर
घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. उज्ज्वला योजनेंतील 13.96 लाख लाभार्थी हे एका महिन्यात तीन ते 41 सिलिंडर रिफील करतात तर इंडेन आणि एचपीसीएलच्या आकडेवारीनुसार 3.44 लाख लाभार्थी एका दिवसाला दोन ते 20 एलपीजी सिलिंडर रिफील करतात, मात्र त्यांच्याकडे एकाच सिलिंडरची जोडणी आहे. याशिवाय 1.98 लाख लाभार्थी हे वर्षाला 12हून अधिक सिलिंडर रिफील करत असल्याची माहिती समोर आली आहे.
























































