
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘एनडीए’ नेत्यांच्या उपस्थितीत वाराणसीमध्ये लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान एका महिलेच्या पाया पडले. मोदी पाया पडलेल्या या महिलेपुढे इंग्लंडने देखील गुडघे टेकले होते. एवढ्या मोठ्या देशाचा पंतप्रधान पाया पडलेली ही महिला नक्की आहे तरी कोण याची उत्सुकता तुम्हालाही असेलच. तर या महिलेचे नाव आहे डॉ. अन्नपूर्णा शुक्ला. अन्नपूर्णा शुक्ला यांच्यामुळेच आज जगभरात विकल्या जाणाऱ्या ‘बेबी फूड’वर ‘आईचे दूध लहान बाळासाठी परिपूर्ण आहार आहे’ (‘मां का दूध बच्चे के लिए सबसे उपयुक्त आहार है’) असे लिहिलेले दिसून येते.

डॉ. अन्नपूर्णा शुक्ला यांनी केलेल्या रिसर्चनंतर हे सिद्ध झाले की लहान बाळासाठी आईच्या दुधापेक्षा पोष्टिक कोणतेही खाद्य नाही. 1969 ते 1972 दरम्यान हा रिसर्च मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता. हा रिसर्च समोर आल्यानंतर ब्रिटनमधील सर्वात मोठ्या बेबी फूड कंपनीने आपल्या उत्पादनांवर आईचे दूध लहान बाळासाठी आवश्यक आहे, कारण मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते उपयुक्त आहे, असे लिहिण्यास सुरुवात केली. विशेषत: लहान बाळांसाठी विकल्या जाणाऱ्या दूध पावडरच्या डब्यावर हे लिहिण्यात आले. एवढेच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील या रिसर्चची दखल घेत लहान बाळाला सहा महिन्यांपर्यंत आईचे दूध आवश्यक असल्याचे नमूद केले होते.
आपल्या रिसर्चबाबत बोलताना अन्नपूर्णा सांगतात, रिसर्चदरम्यान आम्हाला असे दिसून आले की जे लोक लहान बाळाच्या स्तनपानावर लक्ष देत नाही त्यांचे वजन कमी असते आणि ते चपळही नसतात. अन्नपूर्णा यांचा रिसर्च प्रसिद्ध झाल्यानंतर बेबी फूड कंपन्यांनी ती सूचना आपल्या उत्पादनावर छापली, परंतु काही कंपन्यांनी ती छापण्यास नकार दिला. अखेर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निर्देशानंतर त्या कंपन्यांना माघार घ्यावी लागली.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी पाया पडल्यानंतर अन्नपूर्णा यांनी त्यांना ‘तुम्ही यशाचे आणखी उंच शिखर गाठणार’ असा आशिर्वाद दिला. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हे सांगितले.




























































