चित्रगुप्त यांना ‘मोहम्मद रफी’ जीवनगौरव, सुदेश भोसले यांचाही सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत ज्येष्ठ संगीतकार चित्रगुप्त यांना या वर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे, तर प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांना रफी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रंगशारदा, वांद्रे पश्चिम येथे मोहम्मद रफी यांच्या जयंतीदिनी म्हणजे 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वा. होणाऱया सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

मोहम्मद रफी यांच्या वाढदिवशी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे दरवर्षी संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवनगौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे बारावे वर्ष आहे. अनुक्रमे 1 लाख रुपये आणि 50 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जम्मू कश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर यांचे सल्लागार आणि लक्षद्वीपचे माजी राज्यपाल फारूख खान यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. चित्रगुप्त यांच्या वतीने त्यांचे पुत्र संगीतकार आनंद आणि मिलिंद हे पुरस्कार स्वीकारतील. या वेळी प्रसाद महाडकर यांच्या ‘जीवनगाणी’तर्फे ‘फिर रफी’ या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ करणार आहेत.