श्रीरामाच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण का होतात! विचारमंथन करण्याची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज आठ हजार वर्षांनंतरही मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित का होतात,  तसे करण्याची संधी लोक सोडत नाहीत यावर विचारमंथन करण्याची आवश्यकता असल्याचे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवन यांनी रविवारी केले. रेशीमबागच्या महर्षी व्यास सभागृहात आयोजित श्री दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारोहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी लोकसभेच्या माजी अध्यक्षा आणि आयोजन समितीच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित होत्या. डॉ. मोहन भागवत म्हणाले की, आज समाजात श्रीरामांसारखी आचरण करणारी व्यक्ती दिसत नाही म्हणून अनेकांना श्रीरामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी मिळते.

दत्तोपंत ठेंगडी यांचे विचार देशातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्यासारखे आचरण करणे महत्त्वाचे असल्याचे भागवत यांनी नमूद केले. व्यक्तिनिर्माण हे संघाचे कार्य असून एक स्वयंसेवक पूर्ण संगठन असावे, असा स्वयंसेवक त्यांनी घडवला. आपल्या हक्कासाठी लढणाऱया कामगारांच्या संघटना अनेक आहेत. परंतु देशासाठी काम करण्याचा भाव कामगारांमध्ये जागवण्याचे कार्य दत्तोपंत ठेंगडी यांनी केले.

रामलल्लाला जागा मिळाल्याचा आनंद
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रामलल्लाला शेवटी जागा मिळाली याचा आनंद झाला, असे लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. यापेक्षा आनंदाची दुसरी मोठी बाब असूच शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जोशी म्हणाले, ‘नो कमेंट’
अयोध्येत वादग्रस्त वास्तू विध्वंस करणाऱयांविरोधात न्यायालयात प्रकरण सुरू असल्यामुळे यासंदर्भात आपण बोलू शकत नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आपण स्वागत करतो, असे ते म्हणाले. मात्र मथुरा आणि काशीच्या विवादित वास्तूविषयी प्रश्न विचारल्यावर ‘ही मागणी कोण करतेय हे आपणास माहीत नाही,’ असे म्हणत त्यांनी ‘नो कमेंट’चा सहारा घेतला.