पुण्यात काँग्रेसकडून गायकवाडांऐवजी मोहन जोशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mohan-joshi-pune

सामना प्रतिनिधी । मुंबई

पुण्यातून लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड यांचा पत्ता ऐनवेळी कट करण्यात आला. त्यांच्याऐवजी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते माजी आमदार मोहन जोशी यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पुण्यामध्ये आता गिरीश बापट यांच्याविरोधात मोहन जोशी आणि वंचित आघाडीचे उमेदवार अनिल जाधव असा सामना रंगणार आहे.

काँग्रेसच्या सर्व जागांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरही पुण्याच्या जागेचा तिढा सुटलेला नव्हता. दोनच दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना प्रवेश देण्यात आल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती, मात्र ऐनवेळी मोहन जोशी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. गायकवाड यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पसंती दिली होती, तर अरविंद शिंदे यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आग्रही होते. काँग्रेसच्या प्रभारीपदाची सूत्रे दोन दिवसांपूर्वीच सोडलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी जोशी यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून जोशी यांना अखेर उमेदवारी मिळाली. जोशी सुमारे दहा वर्षे काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. शहर काँग्रेसने पाठविलेल्या तीन नावांमध्येही जोशी यांचा समावेश होता.

काँग्रेस पक्षासाठी सुमारे 45 वर्षांहून अधिक काळ काम करीत आहे. याची दखल घेत पक्षाने कार्यकर्त्यांना चांगला संदेश दिला आहे. पक्षातील कार्यकर्त्यांच्या बळावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने या निवडणुकीत नक्कीच विजयी होईन, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे. तर काँग्रेसने मोहन जोशी यांना दिलेल्या उमेदवारीमुळे आता जोमाने काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे.