मोखाड्यातील 34 आदिवासी मजुरांना बेवारस सोडून वीटभट्टी मालक गायब

551

मोखाडा तालुक्यातील 34 आदिवासी मजुरांना भिवंडी तालुक्यातील खाराघोडा येथील विटभट्टी चालकाने तालुक्यातील शेलमपाडा नजीक आणुन बेवारस सोडून दिले आहे. कोरोनाच्या भितीने येथील ग्रामस्थांनी या मजुरांना गावात प्रवेश न दिल्याने गावाबाहेरच्या शिवारात बेवारस ऊपाशीपोटी हे मजुर भुकेने व्याकुळ होऊन बसले आहेत. मात्र, येथे तालुक्यातील कुठलीही सरकारी यंत्रणा पोहोचलेली नाही. त्यामुळे येथे भुकबळी जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

मोखाडा तालुक्यातील शेलमपाडा येथील आदिवासी मजुर भिवंडी तालुक्यातील खाराघोडा येथे विटभट्टी कामासाठी गेले होते. येथे या मजुरांना गेली कित्येक दिवसांपासून केवळ एकवेळ चे जेवण दिले जात होते. मात्र कोरोनाचे संकट भयावह झाले असतानाच विटभट्टी मालक सतीश पाटील याने या मजुरांना  शेलमपाडा गावाबाहेरील दोन किलोमीटर अंतरावर बेवारस अवस्थेत सोडून तेथुनच पलायन केले आहे.

कोरोनाच्या भीतीने येथील ग्रामस्थ भयभीत असल्याने त्यांनी या मजुरांना गावात प्रवेश देण्यास मज्जाव केला आहे. या बाबत सामनाच्या प्रतिनिधींनी, आरोग्य आणि महसूल प्रशासनाला कळवूनही कुठलेही प्रशासन येथे पोहोचलेले नाही. त्यामुळे येथे उपचार, तपासणी आणि पोटाला अन्न न मिळाल्याने भुकबळी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मोखाडा तहसीलदार विजय शेट्ट्ये यांना दूरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे ते मुख्यालयात आहेत की नाही या बाबत नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या