
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मोखाडा तालुक्यात भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. दररोज टँकरने पाणीपुरवठा केला जात असून माता-भगिनींची हंडाभर पाण्यासाठी वणवणदेखील चालूच आहे. या पाणीटंचाईचा फटका जनावरांनादेखील बसू लागला आहे. शासनाने जनावरांच्या पाण्याची अद्यापि व्यवस्था न केल्याने तसेच चारादेखील मिळत नसल्याने त्यांची पाण्यासाठी तडफड होत आहे. गाय, बैल, मेंढय़ांचे स्थलांतर सुरू झाले असून तांडेच्या तांडे वज्रेश्वरी, नाशिकच्या दिशेने निघाले आहेत.
मोखाडा तालुका हा दरवर्षी पाणीटंचाईच्या नकाशावर असतो. आतापासूनच येथील गावपाडय़ांवरील विहिरी कोरडय़ा पडू लागल्या असून रोज गावकऱयांना पाच टँकरचा पुरवठा केला जात आहे. मात्र जनालरांचा चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून डोंगर ओडकेबोडके झाले आहेत. तेथे चाराच शिल्लक राहिलेला नाही. तर शासनाने केवळ माणसांसाठीच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तेही 20 लिटर प्रती माणसी. हे तुटपुंजे प्रमाण असल्याने जनाकरांना चारा आणि पाणी द्यायचे कुठून, याचे संकट शेतकऱयांसमोर समोर उभे ठाकले आहे. चारा आणि पाण्याअभावी जनावरांचे हाल सुरू झाल्याने अखेर नाइलाजाने त्यांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.
– जनावरांसाठी चारा व पाणी मिळत नसल्याने मोखाडा तालुक्यातील अनेक कुटुंबे आपले बिऱहाड सोबत घेऊन नाशिक, वज्रेश्वरी तसेच आजूबाजूच्या ठिकाणी जात असल्याचे दिसून येत आहे.
– मोखाडय़ात 35 हजारांहून अधिक गाय व बैल असून शेळ्या-मेंढय़ांची संख्या अंदाजे 17 ते 20 हजार एवढी आहे. त्याशिवाय रेडे, गाढव हेदेखील आहेत. गावांमधील पाणवठे कोरडे पडू लागल्याने त्यांना पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱयांपुढे निर्माण झाला आहे.
गावागावांमध्ये मुक्काम करणार
आमच्या भागात जनावरांसाठी चारा आणि पाणी राहिलेले नाही. त्यामुळे जनावरे पोसायची कशी, असा आमच्या पुढे प्रश्न निर्माण झाला आहे. चारा आणि पाणी जिथे मिळेल तेथे मुक्काम करणार आहोत. त्यामुळे किमान आमच्या जनावरांचे प्राण तरी वाचतील. पावसाळा सुरू झाल्यावर आणि येथे चारा आल्यावर आम्ही पुन्हा घरी परतणार आहोत. – रामा झुगरे, शेतकरी, वाघ्याचीवाडी.
































































