
मनी लॉण्डरिंगप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने समन्स बजावले असून त्यांना गुरुवार, 15 जुलैला सकाळी 11 वाजता कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मनी लॉण्डरिंगप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने या याचिकेचा निकाल राखून ठेवला आहे. मात्र, अद्याप ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. ईडीने आतापर्यंत देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावले आहे, मात्र त्यांच्यापैकी कोणीही अद्याप चौकशीला सामोरे गेलेले नाही. दरम्यान, अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी दोघेही ज्येष्ठ नागरिक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी ऑनलाइन माध्यमातून व्हावी, अशी विनंती देशमुख यांच्या वकिलाने ईडीला केली आहे.




























































