मर्कटलीलांमुळे उपराष्ट्रपती त्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नवी दिल्लीत माकडांची संख्या वाढत असल्याचा मुद्दा राज्यसभेत मंगळवारी उपस्थित करण्यात आला. त्यावेळी आपल्या घराच्या परिसरातही माकडांची संख्या वाढली असून त्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त असल्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. सरकारने माकडांच्या उपद्रवाची समस्या लवकर सोडवावी, असे त्यांनी सांगितले. संसदीय कार्यमंत्री विजय गोयल यांना या समस्येत लक्ष घालण्यास नायडू यांनी सांगितले आहे.

सरकारी निवासस्थानांमध्ये माकडांचा उपद्रव वाढला आहे. माकडे झाडांवरून घरांवर उड्या मारतात. त्यानंतर तेथील वस्तू अस्ताव्यस्त करतात. तसेच वाळत घातलेल्या कपड्यांसह इतरही वस्तू घेऊन पळ काढतात, असे राष्ट्रीय लोकदल पक्षाचे नेते रामकुमार कश्यप यांनी राज्यसभेत सांगितले. त्यावर नायडू यांनी आपल्या निवासस्थानाजवळही माकडांची संख्या वाढली असून त्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त असल्याचे सांगितले.