राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा, अंतिम आठवडा प्रस्तावावर विधिमंडळात विरोधकांचा घणाघात

राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. दिवसाढवळय़ा खून, बलात्कार, महिलांवर अत्याचार होत आहेत. गुन्हेगारी, अवैध धंदे वाढले आहेत. अमली पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. सरकारचा त्यावर वचक राहिला नाही, अशा शब्दांत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी सदस्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सरकारवर जोरदार घणाघात केला.

विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले. शेतकरी आत्महत्यांसह विविध प्रश्नांवरून सरकारवर त्यांनी टीकेची झोड उठवली. सरकारमधील मंत्र्यांचे विविध घोटाळे समोर येत आहेत, परंतु सत्ताधारी पक्षातील लोक असल्याने या घोटाळय़ांबाबत कारवाई होताना दिसत नाही. दुसरीकडे राज्यात शेतकऱयांचे हाल सुरू आहेत. सरकार मदतीसाठी पुढे येत नाही, मात्र ठेकेदार पंत्राटदारांपुढे पायघडय़ा घालत आहे, असा आरोप दानवे यांनी केला.

गुन्ह्यांमध्ये सत्ताधारी लोकांची नावे 

गुन्हे असो किंवा महिलांवरील अत्याचार असो त्यात सत्ताधारी लोकांची नावे आघाडीवर आहेत. गुत्तेदार व दरोडेखोर सत्तेत असल्याने कोणत्याच गुन्हेगारावर कारवाई होत नाही. राज्यात अशीच स्थिती राहिल्यास महाराष्ट्राचा बिहार होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त करत गृह खात्यावर ताशेरे ओढले. दरम्यान, राज्यातील विविध प्रश्नांची सरबत्ती करत सरकारला जाब विचारला. यावेळी मेंढपाळ बांधवांच्या रक्षणासाठी ऊसतोड कामगारांप्रमाणे कायदा करावा, अशी मागणी दानवे यांनी केली. राज्यातील वेगवेगळय़ा महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकाऱयांकडून त्यांची बेसुमार लुटीकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

शीSS शीSS शीSS शीSS… लाज घालवली, विधिमंडळाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले, विधान भवनात अक्षरशः टोळीयुद्ध; लॉबीत दंगल

नागपूर हिंसाचाराचे केंद्र होतेय

राज्यात मागील पाच महिन्यांत 1 लाख 60 हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये जानेवारी ते मे या काळात दहा हजार 423 गुन्हे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूर आज हिंसाचाराचे केंद्रबिंदू होत आहे. नागपूरमध्ये सध्या असुरक्षित वातावरण आहे, अशी खंत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या

27 जुलै 2022 रोजी मेट्रोच्या संदर्भात आरे कॉलनीत आंदोलन झाले. तेथील झाडे तोडू नयेत म्हणून शाळकरी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनात भाग घेतला तेव्हा पोलिसांनी 29 हून अधिक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. ते गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन दिले होते, पण अद्यापपर्यंत गुन्हे मागे घेतलेले नाहीत. मानवतेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांवरील हे गुन्हे मागे घेण्याची मागणी यानिमित्ताने सुनील प्रभू यांनी केली