आदित्य ठाकरे यांचा मिंधेंवर हल्ला… एवढी नमकहराम, एहसान फरामोश व्यक्ती आयुष्यात पाहिली नाही

विधानसभेतील खडाजंगीमुळे सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अक्षरशः पह्डून काढले. ‘नमकहराम… एहसान फरामोश… गद्दार’ असा उल्लेख करत भ्रष्टनाथ मिंधेएवढी निर्लज्ज व्यक्ती आयुष्यात कधी पाहिली नाही, असा जोरदार हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला.

ज्यांनी सामाजिक, राजकीय ओळख दिली. तिकिटे दिली. मंत्रीपदे दिली. त्या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर बोलताना थोडीतरी लाज बाळगा. आई-वडिलांचे काय संस्कार असतील तुमच्यावर निर्लज्जांनो. समोर आल्यानंतर डोळय़ात डोळे घालून बघण्याची हिंमत नाही तुमच्यात, असे आदित्य ठाकरे यांनी सुनावले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील आमदार गेली तीन आठवडे मंत्रिमंडळाला अनेक प्रश्नांवरून घेरायचा प्रयत्न करताहेत. सरकार बॅकफूटवर जावे अशी आमची भूमिका नाही पण बेस्ट, शेतकरी आत्महत्या, धारावी जमीन घोटाळा आदी प्रश्नांची उत्तरे आम्हाला सरकारकडून हवी आहेत. कारण आमदार म्हणून आम्हाला मतदारसंघातील जनतेला उत्तर द्यायचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई-पुणे मिसिंग लिंकची किंमत का वाढली? कोस्टल रोडमध्ये किती वेळा पंत्राटदार बदलले? साडेसहा हजार कोटींचे एस्केलेशन काय आहे? अगदी महाविकास आघाडीचे सरकार पाडले तेव्हाही कोस्टल रोडच्या कामात एस्केलेशन केले. भ्रष्टनाथ मिंधेंनी रस्त्यांपासून सगळीकडे पैसे काढण्याचे काम केले आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्री स्वतः उत्तरे देतात, मिंधे का देत नाहीत?

चालू अधिवेशन असो वा यापूर्वीची अधिवेशने, लक्षवेधी, प्रश्नोत्तरे, निवेदनांवर मुख्यमंत्री स्वतः त्यांची उत्तरे द्यायला येतात. मग मिंधेंचे कुठे अडतेय? ते का त्यांच्या नगरविकास खात्यावर निवेदन करायला येत. उत्तर द्यायचे असेल तर विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्या, रटाळ भाषण करायला येऊ नका, असेही आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना सुनावले.

ज्या शिवसेना, उद्धव ठाकरेंनी ओळख दिली, त्यांच्यावर बोलताना लाज बाळगा!

आदित्य ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या कृतघ्नतेवर जोरदार प्रहार केला. आदित्य ठाकरे म्हणाले की, भ्रष्टनाथ मिंधेंचा चेहरा कुठेही नव्हता, कुणालाही माहीत नव्हता तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना वर आणले. आमदारकी दिली. नंतर सलग दोन वेळा मंत्रीपद दिले. कोणच्याही मुख्यमंत्र्याने सोडले नव्हते ते नगरविकास खाते त्यांच्याकडे दिले. त्यानेच आमचे सरकार पाडले. नगरविकास खाते, समृद्धीमध्ये घोटाळे केल्याने ईडी त्यांच्या घरात पोहोचली म्हणून त्यांना सुरतेला पळावे लागले. मग वॉशिंग मशीनमध्ये उडी मारली, असा घटनाक्रम सांगत आदित्य ठाकरे यांनी शिंदेंचा समाचार घेतला. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्या निर्लज्जांनो, नगरविकास खाते त्यावेळी तुमच्याकडेच होते आणि सर्व प्रस्तावावर तुमच्याच सह्या आहेत, याचीही आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली.