
सामना ऑनलाईन। मोरादाबाद
पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याची दुसरी चूक केली तेव्हा आम्ही त्यांच्या घरात घुसून एअर स्ट्राइक केला. आता पाकिस्तानच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली आहे की तिसरी चूक केली तर होत्याचे नव्हते होईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सूचक शब्दांत इशारा दिला आहे.
उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथील सभेमध्ये ते बोलत होते. याआधी दहशतवादी पाकिस्तानातून यायचे. आपल्यावर हल्ला करायचे आणि काँग्रेस सरकार जगासमोर आपल्यावर हल्ला झाला म्हणून रडगाणे गायचे. पण हा नवीन हिंदुस्थान आहे. जेव्हा दहशतवाद्यांनी उरीमध्ये हल्ला केला तेव्हा आपल्या शूर सैनिकांनी तिथे जाऊन सर्जिकल स्ट्राइक केला असे मोदी म्हणाले. दरम्यान, ज्याच्यात क्षमता असते त्याचेच ऐकले जाते, जो फक्त रडत राहतो त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते, असेही ते म्हणाले.
मुफ्ती, अब्दुल्लांना देशाचे तुकडे करू देणार नाही!
‘मुफ्ती आणि अब्दुल्ला घराण्यांनी जम्मू-कश्मीरच्या तीन पिढय़ांचे आयुष्य बरबाद केले आहे, मात्र मी त्यांना देशाचे तुकडे करू देणार नाही’ असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला यांच्यावर चढवला. कठुआ येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
‘मी झुकतही नाही आणि विकलाही जात नाही’ असे म्हणत मोदी यांनी मुफ्ती व अब्दुल्ला परिवारावर हल्ला चढवताना म्हटले आहे की, कश्मीरच्या उज्ज्वल भविष्यासाठी या दोन कुटुंबांना इथून बाहेर काढायला हवे. ते मोदींविरोधात हवी तितकी बदनामी करतील, पण देशाचे तुकडे करू शकणार नाहीत असे यावेळी मोदींनी सांगितले. पंतप्रधानांनी यावेळी कश्मिरी पंडितांना त्यांच्या हक्काच्या घरी परत आणणार असल्याचेदेखील आश्वासन दिले. या सभेत त्यांनी काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांवर सडकून टीका केली.




























































