मंडणगड, दापोली, गुहागरातील 4 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणार

809

निसर्ग वादळाचा धोका लक्षात घेऊन गुहागर, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील किनारपट्‌टीवरील 2 हजार  689 लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे़. बुधवारी सकाळपर्यंत सुमारे 4 हजार ग्रामस्थांना स्थलांतरीत करण्यात येईल़. त्याचबरोबर वादळाच्या काळात विद्युतप्रवाह खंडित करण्यात येणार आहे़. नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि सर्व प्रशासन आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज आहे़ एनडीआरएफची पथकेही जिल्ह्यात दाखल झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवारी कोकण किनारपट्‌टीवर निसर्ग वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे़. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे़. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्याच्या स्थितीवरुन या वादळाचा फटका दापोली, मंडणगडला बसण्याची शक्यता अधिक वाटत आहे़. यामध्ये दापोलीमधील 24 गावे आणि मंडणगडमधील बाणकोट, वेळास आणि वेसवी या तीन गावांमध्ये यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे़. किनारपट्‌टीवरील लोकांना असलेला धोका लक्षात घेऊन आज सायंकाळपर्यंत मंडणगड तालुक्यातील 1258, दापोली तालुक्यातील 235, गुहागर तालुक्यातील 1196 लोकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे़.

बुधवारी सकाळपर्यंत 4 हजार लोकांचे स्थलांतरण करण्यात येईल. एनडीआरएफच्या पथकांसह प्रशासन यंत्रणाही मदतकार्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे़. दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात असल्याचे मिश्रा यांनी सांगितले़.

आपली प्रतिक्रिया द्या