पर्यटकांच्या गर्दीने कोल्हापूर गजबजले, तीन दिवसांत साडेतीन लाखांहून अधिक भाविक श्री अंबाबाईचरणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

दोन दिवसांपूर्वी जिह्यात झालेला मुसळधार पाऊस त्यानंतरही पावसाचे वातावरण कायम असतानाही, मे महिन्यातील सुट्टीच्या हंगामात जिल्हा पर्यटकांनी गजबजून गेला होता. गेल्या तीन दिवसांत तब्बल साडेतीन लाखांहून अधिक भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यामुळे सर्वत्र हॉटेल्स, लॉजिंग फुल्ल झाली होती, तर पार्किंगमुळे वाहनधारकांची कोंडी झाल्याचेही पाहावयास मिळाले.

धार्मिक, ऐतिहासिक आणि कलेचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिह्यास पर्यटकांची मोठी पसंती आहे. दोन वर्षांनंतर कोरोना संसर्गाची लाट ओसरल्यामुळे पूर्वीचे कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे या उन्हाळी सुट्टीने हॉटेलिंगसह सर्व व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. एकीकडे पर्यटनाचा हंगाम भरला असतानाच, जिह्यात पावसाचे आगमन झाल्यामुळे त्याचा काहीसा परिणाम झाला. तरीसुद्धा सलग सुटय़ांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. शुक्रवारी तब्बल 69 हजार 870 भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. शनिवारी 1 लाख 27 हजार 901 भाविकांनी दर्शन घेतले. तर, रविवारी दुपारपर्यंत तब्बल 1 लाख 53 हजार 284 भाविक देवीच्या चरणी लीन झाल्याची नोंद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे झाली. सकाळपासूनच गर्दीमुळे भाविकांच्या रांगा मंदिराबाहेर भवानी मंडपपर्यंत लागल्या होत्या.