शिरोळ तालुक्यातील अनेक गावे अद्याप पाण्याखालीच; दीड लाख लोक विस्थापित

298

मनोज पोटे

शिरोळ तालुक्यातील अनेक गावे अद्याप पाण्याखालीच असून या गावांमध्ये हजारो लोक अडकले आहेत. या पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरद्वारे अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. पुरामुळे शिरोळ तालुक्यातील ४२ गावांतील ४० हजार ४५२ कुटुंबातील १ लाख ६२ हजार २१० लोकांना अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. या बचाव व मदतकार्यासाठी ६५ बोटी व ३८५ कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते. यामध्ये लष्कर, नौदल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टल गार्ड, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका यांचा समावेश आहे.

शिरोळ तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्त असण्याची ही पहिलीच वेळ आहे. तालुक्यात ९३ संक्रमण शिबिरांमध्ये ४० हजारहून अधिक लोकांची सोय करण्यात आली आहे. या शिबिरांतील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबरोबरच पाणी, आरोग्य अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. दरम्यान, महाराष्ट्र कमांडो फोर्सचे कोल्हापूर विभागप्रमुख नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील २१ कमांडोंचे एक पथक १७ ऑगस्टपर्यंत शिरोळ तालुक्यात बचावकार्य करणार आहे.

कोल्हापूर शहर व परिसरातील पूरस्थिती ओसरल्याने कोल्हापूर ते सांगली राज्यमार्गावरील बस वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज काही बसगाड्या सांगली व मिरजेकडे जयसिंगपूरमार्गे सोडण्यात आल्या.उदगावनजीक तब्बल आठ दिवस पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर असल्याने काही ठिकाणी रस्ता खचला आहे, तर काही ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ही वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या