…म्हणून डास माणसाचे रक्त पितात, अखेर संशोधकांनी शोधले कारण

डास चावल्याने विविध प्रकारचे आजार होतात हे आपल्याला माहिती आहे. मात्र डास आपले रक्त का शोषतात? त्यांना रक्त पिण्याची सवय कशी लागली? याचा शोध आता संशोधकांनी लावला आहे. याचे कारण वाचून तुम्ही हैराण व्हाल. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून डासांना रक्त पिण्याची सवय नव्हती, तर हळूहळू त्यांच्यात हे बदल होत गेले.

प्रिंसटन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हे उघड झाले की, डास सुरुवातीपासून माणसाचे रक्त पित नव्हते. वाळवंटी आणि कोरड्या प्रदेशात राहात असताना डासांनी माणूस आणि अन्य प्राण्यांचे रक्त प्यायला सुरू केले. प्रजननासाठी पाण्याची कमतरता भासू लागल्याने डासांनी रक्त शोधण्यास सुरुवात केली.

संशोधकांनी आफ्रिकेतील एडिस एजिप्टी या डासांचा अभ्यास केला. याच डासांमुळे जिका व्हायरस, डेंग्यू सारखे आजार पसरतात. आफ्रिकेत एडिस एजिप्टी डासांच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र सर्वच प्रजाती रक्त पित नाहीत. ते अन्य गोष्टी खाऊन जगतात, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

डासांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी वेगवेगळ्या

संशोधक नोआह रोज यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, याआधी डासांच्या विविध प्रजातींच्या खाण्या-पिण्याबाबत जास्त अभ्यास झालेला नाही. आम्ही आफ्रिकेच्या सब-सहारन भागातील 27 ठिकाणांवरून एडिस एजिप्टी डासांची अंडी घेतली. त्यानंतर आम्ही त्यांना बाहेर पडू दिले व त्यांना लॅबमध्ये मनुष्य व इतर प्राण्यांवर सोडले. जेणेकरून, त्यांच्या रक्त पिण्याच्या पद्धती समजतील. निदर्शनात या डासांच्या खाण्या-पिण्याची पद्धत वेगवेगळी निघाली.

सर्वच डास रक्त पित नाहीत

नोआह पुढे सांगतात, संशोधनात एक गोष्ट स्पष्ट झाली की सर्वच प्रकारचे डास रक्त पित नाहीत. ज्या भागातील वातावरण कोरडे आहे तेथे प्रजननासाठी डासांना पाण्याची आवश्यकता पडते. पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी डास मनुष्य आणि प्राण्यांचे रक्त शोषतात. डासांच्या शरीरातील हा बदल होण्यास हजारो वर्षांचा काळ गेला, असेही नोआह यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या