
चौथ्यांदा मुलगी झाल्याने निर्दयी मातेनेच आपल्या नवजात अर्भकाचा गळा घोटल्याची धक्कादायक घटना डहाणूत घडली आहे. पूनम शहा असे या महिलेचे नाव आहे. डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात तिने हे भयंकर कृत्य केले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोलकाता येथील सासरी असलेली पूनम शहा ही महिला आपल्या आईवडिलांकडे डहाणू शहरातील लोणीपाडा येथे काही दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी आली होती. मागील आठवडय़ात तिची सुरक्षित गृहप्रसूती झाली. त्यानंतर तिला व नवजात मुलीला उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र चौथ्यांदा मुलगी झाल्याने पूनमने शनिवारी मध्यरात्री नाक, तोंड दाबत नवजात बाळाची हत्या केली.






























































