
सामना ऑनलाईन । मुंबई
आज 21 फ्रेब्रुवारी म्हणजेच जागतिक मातृभाषा दिन. आपण आपल्या आईकडून जी भाषा पहिल्यांदा शिकतो ती आणि आपल्याला या जगाची पहिली ओळख करून देते ती भाषा म्हणजे मातृभाषा. खरंतर मातृभाषा दिवसासाठी कोणताही दिवस साजरा होऊ शकतो, पण तरीही 21 फेब्रुवारी हा दिवसच का याचं उत्तर इतिहासात सापडतं. पाकिस्तान सरकारने दिलेल्या अन्याय्य निर्णयाच्या विरोधात दिलेल्या लढ्याच्या स्मृतीला अभिवादन म्हणून हा दिवस युनेस्कोने निवडला आहे.
मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यापासून वसलेल्या विविध नागरी संस्कृतींचे मूळ आणि कूळ सांगणाऱ्या भाषा ही मानवाची एक स्वतंत्र ओळख. निसर्गाने दिलेल्या स्वरयंत्राचा आणि हातातल्या चित्रकलेचा वापर करून मानवाने विविध भाषा विकसित केल्या, त्या जपल्या, वाढवल्या. काळाच्या विविध टप्प्यांवर स्वतःची नागर संस्कृती विकसित करताना भाषा हीसुद्धा त्याची एक ओळख बनली. म्हणूनच कदाचित भाषा हा मानवी उत्क्रांतीतला एक मैलाचा दगड आहे. हीच ओळख पुसण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आणि मातृभाषेसाठीच्या आंदोलनाची ठिणगी पडली.

याची सुरुवात झाली ती हिंदुस्थानच्या फाळणीपासून. 1947 मध्ये फाळणी झाली आणि अखंड हिंदुस्थानचे अजून दोन तुकडे वेगळे झाले. पहिला पाकिस्तानचा आणि दुसरा आताचा बांगलादेश व तेव्हाचा पूर्व पाकिस्तान. पाकिस्तानने स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळताच राज्यकारभार सुरू केला आणि 1948 मध्ये कारभारासाठी उर्दू राष्ट्रभाषा म्हणून जाहीर केली.

पण, त्यावेळचा पूर्व पाकिस्तान हा बहुतांश बंगाल प्रांताचा भाग असल्यामुळे तिथल्या नागरिकांना हा निर्णय आवडला नाही. कारण, त्यांची मातृभाषा बांगला होती. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान सरकारकडे बांगला ही भाषाही राष्ट्रीय भाषांमध्ये समाविष्ट व्हावी अशी मागणी केली. मात्र, पाकिस्तानने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे पूर्व पाकिस्तानात प्रचंड जनक्षोभ उसळला. त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या सभांमधून बांगलासाठीची मागणी जोरदारपणे लावून धरण्यात आली.

पाकिस्तानने अत्यंत क्रूरपणे हे आंदोलन दडपायला सुरुवात केली. पाकिस्तान सरकारने बांगलाप्रेमींच्या सभा उधळून लावल्या. बांगलाप्रेमींना तुरुंगवास घडवले. पण, तरीही लोक बधत नाहीत असं पाहून एक दिवशी ढाका येथे सुरू असलेल्या रॅलीवर गोळीबार करण्यात आला. त्यात काहीजण मृत्युमुखी पडले आणि 100हून अधिक जण जखमी झाले. तो दिवस होता 21 फेब्रुवारी 1952.

आजवरच्या इतिहासातली ही अतिशय दुर्मीळ घटना आहे, जिथे मातृभाषेसाठी राष्ट्राच्या विरोधात प्रखरपणे विरोध करण्यात आला आणि लोकांनी आपलं रक्तही सांडलं. पण, त्यांचं हे बलिदान फुकट गेलं नाही. चार वर्षांच्या लढ्यानंतर त्याला यश आलं आणि त्यापुढे पाकिस्तान सरकार नमलं. 1956मध्ये बांगला या भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला. तेव्हा पूर्व पाकिस्तानात 21 फेब्रुवारी हा दिवस भाषा आंदोलन दिवस म्हणून साजरा केला गेला.

युनेस्कोलाही बांगला भाषाप्रेमींचा हा लढा खूप भावला. त्यामुळे मातृभाषा दिवस कोणता ठरवायचा या प्रश्नावर 21 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली. 1999मध्ये अधिकृतरित्या हा दिन जाहीर झाला आणि 21 फेब्रुवारी 2000 रोजी पहिला जागतिक मातृभाषा दिन साजरा केला गेला. आजही बांगलादेशात 21 फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या मातृभाषेसाठी जिवाचं बलिदान देणाऱ्यांच्या स्मृतींना अभिवादन करतात.





























































