रत्नागिरी येथे मोटारसायकल चोराला अटक

रत्नागिरी येथे राहणारे रोशन चंद्रकांत सुर्वे यांची यामाहा कंपनीची मोटारसायकल रत्नागिरी ते हातखंबादरम्यानच्या रोडवर उभी करून ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. या गुन्ह्याची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात 3 ऑगस्टला करण्यात आली.

त्यानंतर रात्रीच्या वेळी गस्त आणि नाकाबंदी करणारे अधिकारी आणि अंमलदार यांना याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी मिरकरवाडा चौकी येथे ड्युटीवर असणारे अंमलदार पोलीस नाईक संतोष करळकर यांनी रोशन सुर्वे यांच्या मोटारसायकल क्र. एम.एच.08/ए. के. 5918 चा शोध घेतला आणि ही मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीस उद्यमनगर येथे अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेली मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली.

मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपीचे नाव अमित रामनारायण तिवारी (42) , रा. बंडोरा ता.जि. अमरावती असे आहे. त्याच्या नावावर यापूर्वी 41 गुन्हे दाखल असून त्याला अमरावती जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस नाईक संतोष करळकर यांनी दिली आहे.

या गुन्ह्यात चोरीला गेलेली मोटारसायकल आणि आरोपीचा शोध पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग व उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल लाड, धनंजय चव्हाण, संतोष गायकवाड, संतोष करळकर, रोशन सुर्वे यांनी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या