
>> रश्मी पाटकर
असं म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी! म्हणजेच, जगन्नाथालाही या संपूर्ण जगाचा रथ ओढण्यासाठी त्याची सहचारिणी लक्ष्मीचा हात लागतो. साक्षात वैकुंठाचा कारभारही रखुमाईविना पोरका असतो. थोडक्यात काय तर या जगाचा अर्धा भार बाईने आपल्या नाजूक खांद्यावर पेललेला आहे आणि तो भार ती हसत हसत निभावून नेते, तेही आपलं माणूसपण जपत हे विशेष. अशाच या बाईपणाचा भार साहवणाऱ्या सहा बहिणींची धमाल गोष्ट बाईपण भारी देवा हा चित्रपट सांगतो.
जया (रोहिणी हट्टंगडी), शशी (वंदना गुप्ते), साधना (सुकन्या मोने), केतकी (शिल्पा नवलकर), पल्लवी (सुचित्रा बांदेकर) आणि चारू (दीपा परब) अशा या सहा बहिणी. एकमेकींच्या पाठी जन्माला आलेल्या आणि आता आपापल्या जगात संसाराला लागलेल्या. त्या प्रत्येकीची वेगळी तऱ्हा आहे, त्यांचं विश्व आहे. त्यातल्या अडचणी, हळवे कोपरे आहेत. म्हणायला बहिणी असणाऱ्या या सगळ्या जणी आता फक्त कारणांती भेटतात. या सगळ्या बहिणींमध्ये महत्त्वाकांक्षी आणि कर्तबगारी गाजवलेली शशी एक दिवस निवृत्त होते. एकुलत्या एका मुलीच्या सासुशी सतत स्पर्धा करण्याच्या सवयीमुळे शशी आपली विहिण भाग घेत असलेल्या मंगळागौरी स्पर्धेत उतरून तिची जिरवायची ठरवते. पण, यासाठी तिला तिच्या सगळ्या बहिणींची साथ हवी असते. एकेकाळी एकमेकींच्या हातात हात गुंफलेल्या या सगळ्याजणी आता वेगवेगळ्या दिशांना पांगलेल्या असतात. त्यांना एकत्र आणून मंगळागौर खेळवण्याचं आव्हान शशी स्वीकारते. या सहाजणी एकत्र येतात का? नेमकं असं काय घडलेलं असतं की, त्यामुळे या सहा जणींमध्ये वितुष्ट येतं. या सहा जणींची स्वतःची काय आव्हानं असतात? मंगळागौरीच्या निमित्ताने ती कशी उघड होऊ लागतात आणि त्यावर पुढे काय होतं… ते मात्र, चित्रपटातच पाहावं लागेल.
चित्रपटाची कथा ही तशी नेहमीची, मालिकांमध्येही दाखवलेली वाटू शकते. पण, तिची हाताळणी लाजवाब झाली आहे. अगबाई अरेच्चा या चित्रपटात एक हटके विषय हाताळणाऱ्या केदार शिंदे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. बाईच्या भावना, त्यांची वीजिगिषु वृत्ती, त्यांची आव्हानं, घर-संसार सांभाळून आजच्या जगात आघाडी मिळवण्याची जिद्द, स्पर्धेच्या जगात जगताना झालेली फरफट, कठोरपणाच्या खाली दडलेलं ममत्व हे सगळं शिंदे यांनी आपल्या चित्रपटात पुरेपूर दाखवलं आहे. पूर्वी मंगळागौरीसारखे खेळ हे घरात घुसमटणाऱ्या महिलांना एकत्र येऊन दोन घटका मनोरंजन व्हावं म्हणून खेळले जात असत. त्या निमित्ताने स्त्रिया एकत्र जमून आपले त्रास विसरत. हाच धागा पकडून शिंदे यांनी या सहाजणींची कथा गुंफली आहे. पटकथा आणि प्रसंग हे खुमासदार झाल्याने चित्रपट कुठेही एकसुरी किंवा कंटाळवाणा होत नाही, हे विशेष.
अभिनयाच्या बाबत बोलायचं झालं तर या सहा जणींनी स्क्रीनवर कल्ला केला आहे. सगळ्या एकसे एक तगड्या अभिनेत्री असल्याने त्यांच्यातले प्रसंग पाहताना मजा येते. सगळ्यात कौतुक ते साधना झालेल्या सुकन्या मोने यांचं. त्यांनी यापूर्वीही मालिकांमधून ज्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत, त्याच्याशी साधर्म्य साधणारी भूमिका असली तरी त्यांनी त्या व्यक्तिरेखेला जी विनोदाची फोडणी दिली आहे, ती निव्वळ लाजवाब आहे. या सहाजणींना अभिनयात साथ देणाऱ्या शरद पोंक्षे, स्वप्नील राजशेखर, पियुष रानडे, सतीश जोशी या पुरुष कलाकारांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. चित्रपटाची तांत्रिक बाजूही चांगली आहे. पटकथेत काही उणिवा असून काही प्रसंग चांगलेच खटकतात. पण, तरीही रंजक पद्धतीने कथापट पुढे सरकत असल्याने त्याची पकड सुटत नाही.
बाईपण हे निसर्गाने दिलेलं वरदान आहे. कारण, निसर्गाच्या सृजनाच्या शक्तिचं प्रतीकात्मक रूप हे बाई आहे. म्हणूनच या जगातल्या दया, क्षमा, शांती, शक्ती, बुद्धी, लक्ष्मी, विद्या, क्षुधा, तृप्ती या मूलभूत प्रेरणा स्त्रीशी निगडीत आहेत. त्या सगळ्या प्रेरणांसह स्त्री आपल्या बाईपणाचा भार हसत हसत सोसते, हे हा चित्रपट पाहून पुन्हा एकदा निश्चीत जाणवेल.





























































