
राज्याच्या केंद्राकडे प्रलंबित असलेले प्रकल्प तसेच प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या खासदारांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे. या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना अध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडे असलेल्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील खासदारांची बैठक झाली होती. 27 जानेवारी रोजी ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. या बैठकीत राज्याच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी खासदारांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा तसेच या समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ‘महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समिती’ असे या समितीचे नाव आहे. या समितीचे अध्यक्ष अरविंद सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. अरविंद सावंत यांना नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे कार्यालय देण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यालयासाठी आवश्यक कर्मचारीवर्ग हादेखील महाराष्ट्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.





























































