विमानतळाला दिबांचे नाव नाहीच; डिसेंबरमध्ये भूमिपुत्रांचा महामोर्चा; खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याबाबत घोषणा होणे आवश्यक होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशी कोणतीही घोषणा केली नाही. दिबांचे नाव न दिल्याने येत्या 3 डिसेंबरनंतर पुन्हा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिला आहे.

विमानतळाच्या नामकरणाबाबत अधिकृत घोषणा होईल अशी सर्वांची अपेक्षा होती, मात्र सर्वांचाच भ्रमनिराश झाला. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री दिघा येथे भूमिपुत्रांची बैठक पार पडली. या बैठकीत बाळ्यामामा यांनी डिसेंबर महिन्यात मोर्चा काढण्याचा इशारा दिला. याप्रसंगी आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील यांच्यासह भूमिपुत्रांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

60 दिवस वाट पाहणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी मागितला आहे. हा कालावधी येत्या 3 डिसेंबर रोजी संपणार आहे. तोपर्यंत जर दिबांचे नाव विमानतळाला लागले नाही तर लगेच आंदोलनाची रूपरेखा आखण्यात येणार आहे. भूमिपुत्रांचा महामोर्चा विमानतळावर धडकणार आहे, असा इशारा खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिला आहे.

पाच जिल्ह्यांमध्ये जनजागृती करणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामविस्तार दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, असा व्हावा यासाठी आंदोलनाचा मोठा लढा उभा करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात जोरदार जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी गावागावात आणि शहरामध्ये बैठका सुरू करण्यात आल्या आहेत, असे यावेळी भूमिपुत्रांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.