फडणवीसांनी हिंडलग्याचा इतिहास माहित करून घेणे गरजेचे होते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सीमाभागात येऊन मराठी भाषिकांविरोधातच अवमानकारक वक्तव्य करण्यापूर्वी फडणवीस यांनी हिंडलग्याचा इतिहास माहीत करून घेणे गरजेचे होते. सीमाभागात तुम्ही का आलात आणि कोणासाठी आलात? असा सवाल येथील मराठी भाषिक जनता तुम्हाला विचारत असल्याचे सांगून शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी फडणवीस यांना ठणकावले.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना-मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ कणबर्गी येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, उमेदवार शुभम शेळके, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काल भाजपच्या सभेसाठी बेळगावात आले होते. यावेळी त्यांनी मराठी भाषिकांसदर्भात केलेल्या वक्तव्याने सीमाभागात मराठी भाषिकांत संतापाची लाट उसळली आहे. या जाहीर सभेतून धैर्यशील माने यांच्यासह रूपाली चाकणकर यांनी फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला.

खासदार माने म्हणाले, मराठी माणसांनी आता पुन्हा एकत्र येण्याची वेळ आली आहे. आजची तरुणाई गावागावातून पेटून उठली आहे. यातूनच आम्हालाही निवडणूक जिंकून हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली द्यायची आहे. मराठी माणूस रडणारा नाही, तो लढणारा आहे, लढवय्या आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवायला हवे, असा इशाराही त्यांनी दिला.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांचे स्मारक हिंडलगा येथे आहे. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहण्यासाठी जाणे आवश्यक होते; पण त्याच ठिकाणी असलेल्या भाजपच्या व्यासपीठावरून मराठी माणसांच्या विरोधातच भाषण करून मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा. प्रत्येक वेळेस फडणवीस मराठी माणसांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे पाहत आहे.

सत्तेत असताना तुमचे सीमा समन्वयकमंत्री चंद्रकांत पाटील हे एकदाही बेळगावात आले नाहीत. यामुळे मराठी माणसांत तुमच्याबद्दल असलेली चीड या निवडणुकीतून दिसून येईल, असेही चाकणकर यांनी ठणकावले.