
मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या करणारे दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच आपले जीवन संपवल्याचे समोर येत आहे. डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे भाजपाच्याच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते, असा दावा काँग्रेसने केला आहे.
मोहन डेलकर हे संसदेतील एक वरिष्ठ खासदार होते. सात वेळा त्यांनी खासदारकी भूषवली होती. गेल्या सोमवारी मरीन ड्राइव्ह येथील ‘सी-ग्रीन’ हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्याजवळ एक गुजराती भाषेतील 16 पानांची सुसाईड नोट पोलिसांना सापडली होती. त्यात पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच भाजपचे नेते, गुजरातचे माजी गृहमंत्री आणि दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केल्याची माहिती काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिली.
‘जिवंतपणी नाही पण मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा म्हणून डेलकरांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. त्यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेले प्रफुल्ल पटेल हे भाजपाचे वरिष्ठ नेते असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही ते जवळचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.’ अशी मागणी सचिन सावंत यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केली आहे.
डेलकरांना भाजपकडून भयंकर त्रास
‘खोटय़ा गुह्यांमध्ये अडकवणे, समर्थकांचा छळ करणे तसेच नोकरशाही, तपासयंत्रणा, पोलीस आणि स्थानिक गुंडांकडूनही छळवणूक करणे असा त्रास भाजपाकडून दिला जात असल्याची व्यथा खासदार डेलकर यांनी स्वतः व्हिडियो संदेशाच्या माध्यमातून मांडली होती. त्रास का देता अशी विचारणा केल्यावर त्यांना ‘उपरसे ऑर्डर है’ असे उत्तर दिले गेले. हा प्रकार म्हणजे इंग्रजांच्या छळवणुकीपेक्षाही भयंकर आहे असे डेलकर म्हणाले होते. लोकसभेमध्ये राजीनामा देऊन ते आपली व्यथाही मांडणार होते. संसदेच्या मागील अधिवेशनात त्यांनी आपल्या भाषणात त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलेही होते.’ असे सावंत यांनी सांगितले.
दोषींवर कारवाई करणार – गृहमंत्री
सात वेळा खासदार म्हणून निवडून येणाऱ्या मोहन डेलकर यांच्यासारख्या व्यक्तीने आत्महत्या करणे संशयास्पद आहे. त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या का केली? सुसाईड नोटमध्ये नाव असलेले भाजपचे प्रफुल्ल पटेल आणि अन्य अधिकारी यांच्या त्रासामुळे डेलकर यांनी आत्महत्या केली का? प्रफुल्ल पटेल यांच्याद्वारे केंद्राचा दबाव होता का? पटेल यांचा प्रशासनावर दबाव होता का? तिथे न्याय मिळणार नाही म्हणून डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली का? असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
भाजपाकडून विरोधकांचा मानसिक छळ, काँग्रेसचा आरोप
देशातील विविध राज्यांमधील सरकारे तसेच विरोधी पक्षांचे आमदार, खासदार यांना अशाच प्रकारे भाजपकडून त्रास दिला जात आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचाही वापर केला जात आहे. महाराष्ट्रातील आमदार, खासदारांनाही केंद्र सरकारकडून असा त्रास दिला जात आहे, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे. डेलकर यांच्या आत्महत्येने देशात लोकशाही आहे का असा प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती देशात आहे, असे ते म्हणाले.




























































