प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागर समितीवरून उचलबांगडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नथुराम गोडसे देशभक्त होता असे वक्तव्य भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी संसदेत केले होते. यावरून बराच वाद झाल्याने भाजपने  त्यांना संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीतून काढून टाकले आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी ही माहिती दिली आहे.

बुधवारी संसदेत एसपीजी विधेयकावर चर्चा सुरू होती. द्रमुक पक्षाचे खासदार ए राजा संसदेत बोलत होते. तेव्हा गांधी हत्येचा मुद्दा ए. राजा यांनी उपस्थित करून नथुराम गोडसेचा उल्लेख केला. तेव्हा नथुराम गोडसे देशभक्त होता असे खासदार प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या. त्यामुळे संसदेत चांगलाच गदारोळ झाला. विरोधकांनी त्याला जोरदार आक्षेप नोंदवला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पटलावरून ते वक्तव्य वगळले.

प्रज्ञा ठाकूरच्या गोडसेभक्तीवरून भाजप नेते पुन्हा चिडले आहेत. प्रज्ञा ठाकूर यांना सल्लागार समितीवरून काढून टाकण्यात आले आहे. तसेच आगामी भाजपची जी संसदीय बैठक असणार आहे त्यातही प्रज्ञा ठाकूर यांना स्थान नसेल अशी माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिली.

नड्डा म्हणाले की, “प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य निंदनीय आहे. त्याचा मी निषेध करतो.” भाजप अशा कुठल्याच प्रकारच्या विचारसरणीला थारा देत नाही असेही नड्डा म्हणाले.

प्रज्ञा ठाकूर यांचे गोडसेप्रेम हे पहिल्यांदा समोर आलेले नाही. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळी गोडसे देशभक्त होता असे ठाकूर म्हणाल्या होत्या. त्यावेळी भाजपनेत्यांनी नाराजी वर्तवली होती. शहीद हेमंत करकरे यांच्यावर प्रज्ञा ठाकुर यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी दर्शवली होती. तसेच ठाकूर यांना कधीही मनापासून माफ करणार नाही असे मोदी म्हणाले होते.