
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, 2 जानेवारी रोजी होऊ घातलेली पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अशा 390 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे काहींची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने एमपीएससीमार्फत रविवार, 2 जानेवारी रोजी होणारी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
n कोरोनामुळे मागील वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली नाही. त्यामुळे ज्यांची वयोमर्यादा मागील वर्षी संपत होती त्यांना राज्य सेवा पूर्व परीक्षेस बसण्यास संधी देण्यात आली आहे. यासाठी 1 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
































































