कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एमपीएससीच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील एमपीएससीच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित करण्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात आल्या आहेत. राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी याबाबतचे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. राज्य सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू केला आहे. त्यातील तरतुदीनुसार अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आली आहे, त्यामुळे 31 मार्चपर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा स्थगित कराव्यात, असे पत्रात नमूद केले आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून कोणत्याही कारणास्तव होणाऱ्या गर्दीला प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे 31 मार्च 2020 पर्यंत आपल्या स्तरावरून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशा सूचना सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने देण्यात येत आहेत. तरी त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.