एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी गोड बातमी, नवीन वर्षात 7 हजार 560 पदांवर मेगाभरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरल्या जाणाऱ्या विविध पदांवर इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी गोड बातमी आहे. 2021 वर्षअखेरीपर्यंत राज्याच्या विविध विभागांमध्ये तब्बल 7 हजार 560 रिक्त जागा उपलब्ध असल्याचे समोर आले असून नवीन वर्षात आयोगामार्फत या पदांवर मेगाभरती होण्याची चिन्हे आहेत.

एमपीएसी आणि सरळसेवेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये यंदा मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ गटांतील एकूण किती पदे रिक्त आहेत याबाबतचे मागणीपत्र ‘एमपीएससी’ने नुकतेच जाहीर केले असून त्यानुसार राज्याच्या 25 विभागांमधील तिन्ही गटांच्या एकूण 7 हजार 560 जागा रिक्त आहेत. यातील 4 हजार 327 पदांसाठीच्या जाहिराती यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत. या परीक्षा पुढील काही महिन्यात होणार आहेत.

याचबरोबर उर्वरित 3 हजार 233 जागांसाठीच्या परीक्षादेखील याच वर्षी घेण्यात येणार आहेत. यामुळे नवे वर्ष ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी घेऊन आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी चिंतेत होते.

परीक्षा होत नसल्याने अनेकांच्या कमाल वयाची मर्यादा ओलांडून चालली आहे. मात्र आता सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षांद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या वाढल्याने ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. येत्या वर्षात या सर्व पदांसाठी परीक्षा घेऊन ‘एमपीएससी’ने विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा. लवकर आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी ‘एमपीएससी’ समन्वय समितीचे महेश घरबुडे यांनी केली आहे.

या विभागांत सर्वाधिक रिक्त पदे

सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षा अशा दोन्ही गटांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे ही सामान्य प्रशासन विभाग (273 /784), कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग (776/ 148), गृह विभाग (647 /512), वित्त विभाग (4 /352), सार्वजनिक आरोग्य विभाग (937 सरळ सेवा), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (1572 सरळ सेवा), जलसंपदा (25/ 298) या विभागांमध्ये आहेत. यासंदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी ‘एमपीएससी’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.