
सोमवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. देशभरातील खासदार, आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मतपेट्यांवर ‘Mr Ballot Box’ (मिस्टर बॅलेट बॉक्स) या नावाने स्वतंत्र हवाई तिकिटं घेण्यात आली. राज्यांच्या राजधान्यांमधून दिल्लीला परतीच्या प्रवासासाठी निवडणूक अधिकाऱ्यांसह मिस्टर बॅलेट बॉक्सची उड्डाणं झाली.
देशाच्या 15 व्या राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता 21 जुलै रोजी होणाऱ्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. 21 जुलैला मतमोजणी होत निकाल जाहीर होणार आहेत. तर 25 जुलैला नवनिर्वाचित राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसासाठी सोमवारी संसद भवन आणि राज्यांच्या विधानसभेत मतदान झाले. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सोमवारी सकाळी 10 वाजता मतदानाच्या प्रक्रियोला सुरुवात झाली. राज्यांच्या विधानसभा आणि संसद भवनात मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी संसदेत मतदान केले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह व्हीलचेअरवरून मतदानासाठी आले होते. प्रकृती अस्वास्थ असूनही ते मतदानासाठी आले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्रई किरण रिजिजू, काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला, सपाच्या खासदार जया बच्चन यांनीही मतदान केले आहे. विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि आमदारांनीही मतदान केले आहे.




























































