
‘मिसेस इंडिया क्वीन 2022’ ही स्पर्धा नुकतीच मुंबईत सहारा स्टार येथे पार पडली. स्पर्धेत मूळच्या नागपूरच्या असलेल्या आणि लग्नानंतर मुंबईत स्थायिक झालेल्या अबोली तेलवणे यांनी प्रथम उपविजेतेपद पटकावले. देशभरातील 20 स्पर्धकांमधून अबोलीने हे यश मिळवले.
अबोली तेलवणे यांचा जन्म आणि शिक्षण नागपूरचे. लग्नानंतर त्या मुंबईत आल्या. व्यवसायाने फार्मासिस्ट असलेल्या अबोली नऊ वर्षांपासून शिक्षकी पेशात होत्या. सध्या त्या तेलवणे पॉवर इक्विपमेंट्सच्या ऑपरेशन्स विभागाच्या संचालक म्हणून काम करत आहेत.
अबोली यांना गायन-नृत्याची आवड आहे. भटकंतीचीही आवड आहे. कुटुंब, मुलांना प्राधान्य देऊन त्या कंपनीचा कारभार सांभाळत आहेत. अबोली यांनी एकाग्रता, शिस्त व सातत्य यांच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली. ‘एसआर क्वीन्स’, ‘मिसेस इंडिया क्वीन्स’च्या श्वेता रॉय आणि रणबीर रॉय यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा पार पडली. अंतिम फेरीपूर्वी दुबईमध्ये पाच दिवस सर्व स्पर्धकांना विस्तृत प्रशिक्षण व ग्रुमिंग सत्रांमधून जावे लागले. या स्पर्धेत टॅलेंट फेरीचा समावेश होता. यामध्ये व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, चरित्र, विविध सोशल मीडिया टास्क व सामाजिक कार्यातील सहभाग आदी निकष होते.
वंचितांसाठी काम करणार
उपेक्षित, वंचितांसाठी काम करण्याची इच्छा अबोली यांनी व्यक्त केली. तरुणाईला तसेच स्त्रियांनाही विविध सामाजिक कार्यांच्या माध्यमातून सक्षम करण्यावर भर देईन, असे अबोली म्हणाल्या. स्त्रियांनी स्वतःसाठी पुढे यावे, कृतींच्या माध्यमातून आपली मते मांडण्यास सुरुवात करावी, समाजातील आपले स्थान भक्कम करावे, असे आवाहन अबोली यांनी केले.

























































