
30नृत्याने शरीर ‘मेंटेन’ राहते, पण नियमित व्यायामाने आपण ‘फिट’ राहू शकतो… सांगतेय प्रसिद्ध नृत्यांगना, कोरियोग्राफर सोनिया परचुरे.
सोनिया स्वतःला फिट ठेवण्यासाठी व स्वतःला शिस्त लावण्यासाठी योग करते. वेळेवर जेवण फार महत्त्वाचे आहे. सोनिया सायंकाळी साडेसहानंतर जेवत नाही. या नियमात कधी खंड पडत नाही. गेली दहा-बारा वर्षे ती खूप फूड कॉन्शियस झाली आहे. बरीच वर्षे झाली, तिने पावसुद्धा खाल्लेला नाही. चपाती नाही, भाकरीला प्राधान्य. अनेक वर्षे झाली, तिने गोड पदार्थही जास्त खाल्ले नाहीत. अगदी चॉकलेटही नाही. गोड पदार्थांमध्ये फक्त आणि फक्त आंबा. आंबा सोनियाचा ऑल टाइम फेवरेट आहे. तळलेले मासे, कोळंबी ती खूप आवडीने खाते. गरमागरम, तव्यातून ताटात काढून दिलेली पुरणपोळी तर जीव की प्राण! भेंडीच्या काचऱया तर फेवरेट डिश आहे. मुलीने बनवलेले डेझर्ट, मुलीच्या हातचे चिकन आणि मटण करी आवडते. पाणीपुरी, वडापाव खायला तिला खूप मजा येते. सोनिया स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी योग, व्यायाम व वॉक नियमितपणे करते. नृत्याचा सराव रोज कमीतकमी दोन तासांचा असतो. नृत्यामुळे फिट राहायला मदत होते.
एक संदेश…
सोनिया सांगते, नृत्याने शरीर मेंटेन राहते, पण नियमित व्यायामाने आपण फिट राहू शकतो. शरीराला सुंदर आकार देऊ शकतो. योग व व्यायाम हे दोन्ही शरीराला गरजेचं आहे. स्वतःचे पथ्य पाळा. अन्न हे पूर्णब्रह्म आहे. कधीही जेवण वाया घालवू नये, हवं तितकंच ताटात घ्या . अन्नाचा अपमान करू नका. कारण त्यासाठी शेतकऱयांनी, घरच्या स्त्रियांनी खूप मेहनत घेतलेली असते. खूप प्रेमाने घरातील स्त्र्ाया जेवण बनवतात. जेवण्याआधी अन्नाला नमस्कार करून जेवावे. यामुळे सकारात्मक विचार निर्माण होतो.
चकलीचा फियास्को
सोनियाच्या चकली बनवण्याची मोठी गंमत आहे. तिला एकदाही चकली नीट जमली नाही. कुठे ना कुठे चूक होते. कधी पीठ अगदीच पातळ तर कधी एकदम घट्ट. आतापर्यंत दुर्दैवाने तिचा चकल्यांचा बेत नेहमी फिस्कटला आहे, पण सोनिया हार मानणार नाही. तिचे प्रयत्न सुरू राहणार आहेत.
>> मृदा झरेकर, म. ल. डहाणूकर कॉलेज




























































