वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी

वीज तोडल्याने महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरणमधील वरिष्ठ तंत्रज्ञाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदाराकडे वीज बिल वसुलीचे काम सोपविण्यात आले आहे. कोंढव्याजवळ असलेल्या उंड्री परिसरात थकीत वीज बिल न भरल्याने कारवाई करण्यात आली. वीज तोडल्याने तिघे आरोपी महावितरणच्या गंगा व्हिलेज कार्यालयात गेले. तंत्रज्ञाला शिवीगाळ केली. त्याला धमकावले. कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ठार मारू, अशी धमकी देत तिघेजण पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. जाधव तपास करत आहेत.

वीजवितरण कर्मचाऱ्यांना मारहणीच्या घटना
तीन दिवसांपूर्वी वीज तोडल्याने शिवाजीनगर गावठाण भागात महावितरणच्या तंत्रज्ञाला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली होती. विमाननगर भागातही वीज कापल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकावून मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली.

आपली प्रतिक्रिया द्या